पुणे शहर

बावधन जमीनविक्री प्रकरण; २.६४ कोटी न दिल्याने बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पुणे : बावधन येथील वडिलोपार्जित जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील तीन फ्लॅटची विक्री केल्यानंतर, त्यातील सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तुषार गणपत दगडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकासक रुपेश हरिभाऊ कुंबरे आणि कांचन रुपेश कुंबरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२), ३१६(५), ३५१(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये १ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, दगडे कुटुंबीयांच्या बावधन बुद्रुक येथील वडिलोपार्जित जमिनीच्या विकासासाठी २०११ मध्ये संबंधित विकासक कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘आर. के. ग्रेसिया’ इमारतीतील काही फ्लॅट जमीन मालकांच्या वाट्याला आले होते. हे फ्लॅट अधिक दराने विकून देण्याचे आमिष दाखवून विकासकांनी आपल्या नावावर कुलमुखत्यारपत्र (GPA) करून घेतल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

पैशांसाठी टाळाटाळ आणि धमक्या

फिर्यादीच्या आरोपानुसार, त्यांच्या वाट्यातील फ्लॅट क्रमांक ३०१, ९०२ आणि ११०२ यांची विक्री करून एकूण ५ कोटी २९ लाख ६१ हजार ३०० रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी स्वतःच्या हक्काची २ कोटी ६४ लाख ८० हजार ६५० रुपयांची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. जेव्हा फिर्यादीने या रकमेची मागणी केली, तब आरोपींनी टाळाटाळ केली एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार २०११ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र एकनाथ आळेकर यांच्याकडे सोपविण्यात आला असून, एफआयआरमधील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून कोथरूड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page