कार-एसटी अपघातानंतर ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध गुन्हा

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शिंदेवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये एका ११ वर्षीय बालकासह बाप-लेकाचा समावेश आहे.
मृतांची नावे ओंकार गिरी (२४), गजानन नामदास (३८), त्यांचा मुलगा समर्थ नामदास (११), सोमनाथ बडे (२३) आणि अनिल आचार्य (४०) अशी आहेत. हे सर्वजण माजलगाव येथील रहिवासी असून तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कारने निघाले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसशी कारची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर खामगाव-पंढरपूर महामार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या मार्गावरील निकृष्ट काम आणि खड्डे अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्याच्या कामाची चौकशी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणी रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन (डीबीएल) कंपनीच्या ठेकेदारासह संबंधित अभियंत्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि रस्त्याच्या कामातील संभाव्य त्रुटींचा तपास सुरू आहे.



