बार्टी आंदोलनाची धग मंत्र्यांच्या दारात; निर्देशांनंतरही निर्णय नाही, विद्यार्थ्यांचा तीव्र संताप

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथील पीएच.डी. फेलोशिपच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. महाराष्ट्र राज्य पीएच.डी. संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी २१वा दिवस, तर मनीषा गवळी आणि प्रतीक पंचशील यांच्या आमरण उपोषणाचा ११वा दिवस आहे. दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्र्यांनी यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते; मात्र त्यानंतरही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संघर्ष कृती समितीने केला आहे.
मंत्र्यांच्या निर्देशांनंतरही कार्यवाही नसल्याचा आरोप
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी शिष्टमंडळाने संजय शिरसाट यांची भेट घेऊन बार्टीच्या २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षांच्या पीएच.डी. फेलोशिप प्रक्रियेतील अडचणी मांडल्या. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढला आहे.
फेलोशिपसाठी प्रमुख मागण्या
फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी द्यावी, वयोमर्यादेची अट रद्द करावी, पदव्युत्तर पदवीतील गुणांसाठी बी-प्लसची अट ग्राह्य धरावी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुणांची पात्रता लागू करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच जाचक अटी व निकष दूर करून संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या आंदोलनात मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसह अनेक संशोधक सहभागी आहेत. बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रकृती खालावत असतानाही मनीषा गवळी आणि प्रतीक पंचशील यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याचे संघर्ष कृती समितीने सांगितले.
शिष्टमंडळात विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी
या शिष्टमंडळात माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड आणि महाराष्ट्र मिशनचे संपादक नरसिंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी जयश्री व्हाऊल, सुरेखा वासनिक, यशवंत लांडगे, प्रवीण खंदारे, दीपक घोडेस्वार आणि संदीप जाधव सहभागी झाले होते.
फेलोशिपच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी संघर्ष कृती समितीने केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर शासन आणि बार्टी प्रशासन आता कोणती पावले उचलते, याकडे संशोधकांचे लक्ष लागले आहे.



