महाराष्ट्र

धनगर समाजाचे १७ सप्टेंबर रोजी परभणीत एकदिवसीय आंदोलन

परभणी : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आगामी १७ सप्टेंबर रोजी परभणी येथे भव्य मेळावा आणि एकदिवसीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची घोषणा मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांनी केली आहे. शहरातील सावली विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी सकल धनगर समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपक बोऱ्हाडे म्हणाले की, धनगर समाजाने आरक्षणासाठी नेहमीच एकजुटीने लढा उभारण्याची गरज आहे. मात्र, समाज विविध पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या नेतृत्वावर अवलंबून राहिल्यामुळे अपेक्षित एकजूट होत नाही, परिणामी आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. यापूर्वी पंढरपूर ते बारामती पदयात्रेसह मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अनेक बैठका होऊनही एसटी आरक्षण मिळाले नसल्याचा गंभीर आरोप बोऱ्हाडे यांनी केला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेऊन जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील व परिसरातील सर्व समाजबांधवांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून या आंदोलनाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page