पंतप्रधान नरेंद्र मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान

निकोसिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या युरोपीयन देश सायप्रसच्या दौ-यावर आहेत.
दौ-याच्या दुस-या दिवशी त्यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील २३ वे नेते आहेत. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही, तर देशातील १४० कोटी जनतेचा आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आमच्या परस्पर समंजसपणाला समर्पित करतो.
सायप्रसची राजधानी निकोसियामध्ये अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस ककक देऊन सन्मानित केले.
सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस ककक साठी मी तुमचे (सायप्रसचे अध्यक्ष), सायप्रस सरकार आणि सायप्रसच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा सन्मान केवळ नरेंद्र मोदींसाठी नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठी आहे. त्यांच्या शक्ती आणि आकांक्षांचा हा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या संस्कृती, बंधुता आणि विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना, आपल्या सामायिक मूल्यांना आणि आपल्या परस्पर समंजसपणाला समर्पित करतो.



