राष्ट्रीय

चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात पाणी व मलबा शिरल्याने मोठा अनर्थ; ७ जण मृत, बचावकार्य सुरू

चमोली (उत्तराखंड) विशेष वृत्त : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात टीएचडीसी (THDC) जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा (गाळ) बोगद्यात शिरल्यामुळे आत काम करणारे अनेक कामगार अडकले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेच्या वेळी सुमारे २२ कामगार बोगद्याच्या आत कार्यरत होते.

भूस्खलनानंतर बोगद्यात पाणी आणि मलब्याचा जोरदार प्रवाह अचानक शिरल्यामुळे बचावपथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), पोलीस, आएटीबीपी (ITBP), लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावमोहीम सुरू केली. मात्र, पाण्याची सतत वाढणारी पातळी आणि बोगद्यात साचलेला मोठ्या प्रमाणातील गाळ यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे.

जिवीतहानी आणि जखमींची स्थिती

ताज्या मिळालेल्या माहितीनुसार, बचावपथकांनी आतापर्यंत १९ कामगारांना सुखरूप बोगद्यातून बाहेर काढून उपचारासाठी गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी दुर्दैवाने ७ कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर काही कामगारांवर अद्याप वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यातील एका गंभीर जखमी कामगाराला पुढील उपचारासाठी श्रीनगर येथील बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही २ कामगार बोगद्यात अडकले असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावपथकांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी संपूर्ण परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रशासकीय आणि बचाव यंत्रणांना मदतकार्य आणखी वेगाने राबवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. बोगद्यात अडकलेल्या उर्वरित कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page