न्यायालयातून फाईल गायब करणाऱ्या वकिलास २ वर्षाचा सश्रम कारावास

पुणे : न्यायालयीन कर्मचारी महिलेकडून केसची फाईल मागून ती गायब करणाऱ्या वकिलास, राहुल रामेश माडेकर यास २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
वंदना विजय अडसूळ या शिवाजीनगर कोर्ट नं ३ येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल माडेकर व आरोपी विद्या संपतराव साळुंखे यांनी केसची फाईल २५ जानेवारी २०१२ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पाहण्यासाठी मागितली.
ती फिर्यादीने विश्वासाने आरोपींच्या ताब्यात दिली व आरोपींनी परत देतो असे म्हणून परत दिली नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरुध्द श भादंवि कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. विद्या संपतराव साळुंखे या दरम्यान मयत झाल्या. सरकार पक्षाने ७ साक्षीदार तपासले. ४ ऑगस्ट रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या न्यायालयात आरोपीतांविरुध्द गुन्हा शाबीत झाला. आरोपीस ५००० दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी अंमलदार सहाय्यक फौजदार मोहन भापकर, कोर्ट अंमलदार हवालदार सोनवणे, महिला पोलीस बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहीले.



