नवी दिल्लीराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

हा पुरस्कार एखाद्या देशाचे प्रमुख आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो.

नवी दिल्ली प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांना एखाद्या राष्ट्राकडून मिळालेला हा २०वा पुरस्कार आहे.

‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ही कुवेतमधील नाइटहूडची ऑर्डर आहे. हा पुरस्कार एखाद्या देशाचे प्रमुख आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जातो. यापूर्वी हा पुरस्कार बील क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश अशा जागतिक स्तरावरील नेत्यांना देण्यात आला आहे. कुवेतमधील बायन पॅलेस येथे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. यानंतर हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत-कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले.

कुवेतच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. याबरोबरच बायन पॅलेसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह हे या समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी हे शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर गेले होते. ४३ वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी कुवेतला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान कुवेतमध्ये राहाणाऱ्या भारतीयांमध्ये उत्साह दिसून आला. नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील शेख साद अल अब्दुल्ला इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या ‘हला मोदी’ कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधीत केले. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमधील गल्फ स्पिक इम्प्लॉइज कॅम्पला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतीय कामकारांशी चर्चा देखील केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page