पुणे शहर

पुण्यातील १८ मृत्यू हे पोलीस यंत्रणेच्या मदतीने घडवलेले खूनच!”; हडपसर बनावट दारू प्रकरणावरून आमदार रोहित पवारांचा थेट आरोप

पुणे : पुण्यातील हडपसर भागात बनावट आणि विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “स्थानिक पोलीस आणि बनावट दारू बनवणाऱ्यांच्या अभद्र युतीमुळेच पुण्यातील १८ कुटुंबं अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून, हे १८ मृत्यू म्हणजे पोलीस यंत्रणेच्या मदतीने घडवून आणलेले खूनच आहेत,” अशी संतप्त भावना रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी नुकतीच हडपसर भागातील बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

शासकीय यंत्रणांवर ‘मृत्यूचे कारण’ लपवल्याचा आरोप

या भेटीनंतर शासकीय यंत्रणांच्या कारभारावर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असतानाही, निर्ढावलेल्या शासकीय यंत्रणांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं खोटं कारण कुटुंबाला सांगितलं. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी पिडीत कुटुंबाला मृत्यूचे खोटं कारण का सांगितलं, हे आता उघड झालंच पाहिजे.”

विकसित पुण्याची वाटचाल गुन्हेगारांच्या शहराकडे”

पुण्यातील बिघडत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना त्यांनी गृहखात्याला आणि सरकारला धारेवर धरले. “गुन्हा करणाऱ्यांसोबत पार्ट्या, कोयता गॅंगसोबत अवैध संबंध आणि दिवसाढवळ्या पोलिसांच्या वेशात होत असलेली दरोडेखोरी यामुळे विकसित पुण्याची वाटचाल आज दुर्दैवाने गुन्हेगारांच्या शहराकडे होत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

तर ‘हाच’ पॅटर्न सगळीकडे दिसेल!

पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेत रोहित पवार यांनी इशारा दिला आहे की, “हे रोखण्यासाठीच आज आम्ही हडपसर भागातील बनावट दारूचा अड्डा फोडला आहे. उद्या जर पीडित कुटुंबांना न्याय मिळाला नाही, तर हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे पहायला मिळेल, हे सरकारने लक्षात ठेवावे.”

आमदार रोहित पवार यांच्या मुख्य मागण्या

◾बनावट आणि विषारी दारूमुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.

◾मृत्यूचे कारण लपवणाऱ्या आणि दोषी असणाऱ्या पोलीस व आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.

◾पुण्यातील अवैध दारूधंदे आणि गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.

या धक्कादायक आरोपामुळे आता पुणे पोलीस आणि राज्य सरकार या प्रकरणावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page