नांदेड

सक्षम ताटे हत्या प्रकरण: आंचल मामीडवार हिने सक्षमचे घर सोडण्यामागचे सांगितले धक्कादायक कारण

नांदेड: नांदेडमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर, त्याच्या प्रेयसीने, आंचल मामीडवार हिने घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्याशी लग्न करून कायमचे त्यांच्या घरी राहण्याचा निर्धार आंचलने केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी ती घर सोडून गेल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर, आता आंचलने समोर येत घर सोडण्यामागचे धक्कादायक कारण स्पष्ट केले असून, सक्षमच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.

सक्षमच्या निधनानंतर त्याची आई संगीता ताटे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, आंचल आजीकडे जाते असे सांगून घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आंचल म्हणाली की, सक्षमच्या धाकट्या भावाकडून माझ्याशी गैरवर्तन केले जात होते. ही बाब मी सक्षमच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि विश्वास न ठेवणाऱ्या वातावरणात राहणे कठीण असल्याने, आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.

या निर्णयाची माहिती आपण सक्षमच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांनाही दिली होती. त्यानंतर पोलिसांनीच आपल्याला आपल्या वडिलांच्या घरी सुरक्षित पोहोचवले, असेही आंचलने स्पष्ट केले. घर सोडल्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबाबत तिने नाराजी व्यक्त केली असून, सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहन तिने केले आहे. सक्षमच्या हत्येच्या धक्क्यातून सावरत असतानाच, आता या नवीन आरोप-प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page