पुणे शहरमुंबई

पुणे विषारी दारू प्रकरण: भिवंडीतून ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांचे राज्यभर कडक कारवाईचे आदेश

विशेष प्रतिनिधी पुणे/मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या विषारी दारूचा मुख्य स्त्रोत शोधून काढत ‘एफडीए’ने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील ‘मेसर्स रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीवर धडक धाड टाकली. या कारवाईत कंपनीच्या गोदामातून तब्बल ५,९२९ किलो घातक मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, पुणे प्रकरणातील जीवघेण्या दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आले होते, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या या गावठी दारूमध्ये मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेले ‘मिथेनॉल’ हे रसायन मिसळण्यात आल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत निष्पन्न झाले. याची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने आणि कडक मोहिमेचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन; लवकरच येणार मोबाईल ॲप

औषधांच्या किंवा रसायनांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास, अथवा कुठेही अवैध साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ ‘एफडीए’कडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रार करताना खालील माहिती देणे आवश्यक आहे:

◾तक्रारदाराचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक

◾संशयित आस्थापनेचा (दुकान/गोदाम) अचूक पत्ता

◾संबंधित औषध, रसायन अथवा पदार्थाची माहिती

नागरिकांनी दिलेल्या माहितीची आणि तक्रारींची पूर्ण गोपनीयता बाळगून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

टोल-फ्री हेल्पलाईन आणि ॲपची घोषणा 

नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच एक स्वतंत्र ‘मोबाईल ॲप’ विकसित करण्यात येणार असून, एक ‘टोल-फ्री हेल्पलाईन’ सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) यांनी दिली.

या कारवाईमुळे राज्यातील अवैध रसायन आणि गावठी दारू माफियांमध्ये तीव्र खळबळ उडाली असून, या प्रकरणाची पाळेमुळे कुठेपर्यंत रुजली आहेत, याचा तपास पोलीस आणि एफडीए करत आहे.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे.”

— तुकाराम मुंढे, आयुक्त (FDA)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page