दहशत माजवणाऱ्या त्रिकुटाचा पाठलाग करुन एकाला पकडले कामावर हजर नसताना कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाचे कौतुक

पुणे : हडपसर परिसरात मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे, फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड करुन दुचाकीवरुन पळून जाणाऱ्या तीन जणांचा पाठलाग करुन विजयकुमार ढाकणे या पोलीस अंमलदारांनी कामावर हजर नसतानाही दाखविलेल्या चौकटीबाहेरील कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे समाजातून कौतुक होत.
हा थरार रविवारी सायंकाळी सातच्या सुमारासघडला. ढाकणे पावणे सातच्या सुमारास त्यांना कुटुंबासह कामानिमित्त शेवाळे वाडी येथे गेले होते. त्यांची त्या दिवशी रात्रपाळी होती. शेवाळवाडी चौकातील चैतन्य स्वीट अँड सेंटर या मिठाईच्या दुकानातील काचेची कपाटे, फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड करुन दुचाकीवरून पळून जाताना ढाकणे यांना दिसले. त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
ढाकणे यांनी घटनेची तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती देऊन एकट्याने आरोपींचा पाठलाग सुरु केला. पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती मिळताच अन्य पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले. दरम्यान, ढाकणे यांनी ६ किलो मीटर पर्यंत आरोपींचा पाठलाग केला. दरम्यान आरोपींची दुचाकी घसरल्याने ते पडले आणि जवळच्या ऊसाच्या शेतात पळून गेले. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पोलिसांना पोलीस ढाकणे यांचे लोकेशन पाठवून जादा मदत पाठवण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १२ पीयू ६२६५ ) ताब्यात घेतली. तर दुसरा अल्पवयीन आरोपी आणि गौरव संतोष अडसूळ ( वय १९ रा. कॉलनी सोसायटीच्या समोर, शेवाळे वाडी पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३९२, ४२७ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, हद्दीचा वाद निर्माण करुन कामाची टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या पार्श्वभूमीवर विजयकुमार ढाकणे यांचे कौतुक होत असून विविध भागांतून सत्कार होत आहे.



