‘त्या’ हल्ल्याच्या वेळी पोलीस चौकीत गैरहजर असलेल्या हवालदारासह तिघे निलंबित

पुणे : पेरूगेट पोलीस चौकी जवळ काही अंतरावरच युवतीवर कोयत्याने हल्ला झाला होता. नंतर हल्ला झालेल्या युवतीने भयभीत होऊन स्वतःला पेरूगेट पोलीस चौकीत कोंडून घेतले होते. त्यावेळी तिन्हीही पोलीस कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. हवालदार सह तीन जणांचा समावेश त्यात आहे.
महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानंतर पुणे हादरले. धाडसी युवकांनी शंतनू लक्ष्मण जाधव या हल्लेखोराला पकडून पोलीस चौकीत नेले. महाविद्यालयीन युवतीवर भरदिवसा कोयत्याने तिच्या डोक्यावर व हातावर वार करून तिला व अन्य एकाला जखमी केले होते.
हल्ल्याच्या वेळेस पोलीस चौकीत उपस्थित नव्हते. ते काम सोडून कोठे गेले होते आदी सर्व तपास करून परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांनी त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
पोलीस हवालदार सुनिल शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीत ते नियुक्त होते. याबाबतचे आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आले.



