१०० बनावट खात्यांत अशोक खरात होता ‘वारसदार’; शिर्डी पोलिसांच्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरू

शिर्डी/राहाता : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शहरातील शाखेत बोगस खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मुख्य आरोपी अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने आरोपीला ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती ‘एसआयटी’चे तपास अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे.
नाशिकमधून ताबा आणि अटकेची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक खरात हा यापूर्वीच एका अन्य गुन्ह्यात नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दिनेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलीस ठाण्यात खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील १०० बनावट खात्यांच्या गाजलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नाशिक ‘एसआयटी’ने शुक्रवारी रात्री उशिरा खरातला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर राहाता ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
५७ व्यक्तींच्या नावावर १०० बनावट खाती आणि ‘तो’च वारसदार
यापूर्वी शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या होत्या. राहाता येथील समता पतसंस्थेत ५७ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० बनावट खाती उघडण्यात आल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या सर्व बोगस खात्यांमध्ये मुख्य आरोपी अशोक खरात याचेच नाव एकमेव वारसदार म्हणून नोंदविण्यात आले होते. या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. शिर्डी पोलिसांनी संबंधित खातेदारांकडे चौकशी केली असता, आपण कोणतेही खाते उघडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पूर्णपणे बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन ही खाती ऑपरेट केल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे.
तपास निर्णायक टप्प्यात
शिर्डीतील जमीन प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एसआयटीने समता पतसंस्थेतील बोगस खात्यांच्या तपासासाठी खरातचा ताबा घेतला आहे. आरोपीला पुन्हा पोलिस कोठडी मिळाल्यामुळे या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. ही बोगस खाती नेमकी कशासाठी उघडण्यात आली? या व्यवहारांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ कोणाला झाला? या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? आणि या गैरव्यवहाराचे धागेदोरे इतर कोणत्या प्रकरणांशी जोडलेले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पुढील चौकशीतून समोर येणार असून, या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



