पुण्यात पुन्हा एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, टायपिंग स्किल टेस्टमध्ये बदल केल्यामुळं विद्यार्थी आक्रमक

पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केल आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगानं केलेल्या बदलामुळं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरु झालं आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणीबाबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क या परिक्षेसाठी आयोग जी कौशल्य चाचणी घेणार आहे, त्याची शब्द मर्यादा जास्त आहे. आमची आयोगाला विनंती आहे की, मराठीसाठी ३० साठी शब्दमर्यादा ही १२० ते १३० शब्द आहेत आणि इंग्रजीसाठी २१० ते २३० शब्द आहेत. याप्रमाणेच आयोगानं आमची कौशल्य चाचणी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आयोगाला बदल करण्याचा निश्चितच अधिकार आहे. पण आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ती मागणी आम्ही कोणाकडे करावी? असा प्रश्न देखील काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.




