दौंडच्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन
पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरु करण्यात सिंहांचा वाटा

पुणे : दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. सन १९७६ मध्ये सुरू झालेल्या पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता दौंड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे हे त्यांचे पूत्र तर, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे या त्यांच्या नात होत.
उषादेवी जगदाळे या सन १९७२ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दौंड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा सन १९८५ मध्ये त्या दौंडच्या विधानसभेतून आमदार झाल्या होत्या.
उषादेवी जगदाळे , माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि बीडच्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकत्र काम केले होते. शिवाय तत्कालीन या तीनही महिलाआमदार या आमदार निवासातही एकत्र राहत असत.
उषादेवी जगदाळे यांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सन १९७२ व १९८५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दौंड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या उषादेवी जगदाळे यांचा सन १९७६ मध्ये सुरू झालेल्या पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरू करण्यात मोठा वाटा होता. सप्टेंबर २०२३ मध्ये राजकीय आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना दौंड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दौंड तालुक्याच्या ‘माॅंसाहेब’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या काळात त्यांनी दौंड तालुक्याच्या विकासासाठी, विशेषतः महिला व ग्रामीण भागातील सुविधांसाठी प्रयत्न केले.



