महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठांविरुध्द तक्रार म्हणजे कामचुकारपणा करणाऱ्यांचे कुभांड?

✍️ नरसिंग कांबळे – मुख्य संपादक
पुणे : सहकार नगर पोलीस ठाण्याच्या ११ महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या आणि ड्यूटी ऑफिसर विरोधात पोलीस आयुक्तांकडे केलेली तक्रार पोलीस दलात चर्चेत आहे. मात्र अशी तक्रार म्हणजे कामचुकारपणा करणाऱ्यांनी कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याविरुध्द कुभांड रचणे आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत साळगावकर यांनी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता आलेल्या महिला कर्मचाऱ्याला रात्री ११ पर्यंत मुद्दाम थांबवून ठेवणे, साप्ताहिक सुट्टी न देणे, मानसिक त्रास देणे, आजारी असतानाही सुट्टी नाकारणे यासारखे प्रकार होत असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. तक्रारदार महिला पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदावर आहेत. त्यांनी सावळगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सावळगावकर वारंवार त्रास देतात असे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
या त्रासाला कंटाळून या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या वरिष्ठांविरुध्द महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. या बहुचर्चित तक्रारीची पोलीस आयुक्त काय दखल घेतात, यानंतर महिला पोलिसांच्या प्रति असलेली मानसिकता बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान तक्रारदारांपैकी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण संबंधित तक्रारीवर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा केला आहे. तक्रार मुख्यत: कामाविषयी आहे. या पार्श्वभूमीवर सावळाराम साळगावकर यांच्या बाजूने सुध्दा मते व्यक्त होत आहेत. वेळेत कामावर न येणे, वेळेआधी कामावरुन निघून जाणे, नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा करणे, नागरिकांना दिलासा मिळेल अशी वर्तणूक नसणे, सुचनांचे पालन जाणीवपूर्वक न करणे, गैरप्रकार करणे यामुळे साळगावकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी चिडून जात एकत्रित तक्रार करण्याचे ठरविले असे बोलले जाते.
कोणत्याही घटनेला दुसरी बाजू असते, तशी याही प्रकारात असून दुसरी बाजू समजावून घेणे गरजेचे आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त या घटनेची चौकशी करताना दोन्ही बाजूंचा विचार करतील आणि संबंधित दोषींना समज देतील,अशी आशा अधिकारी व्यक्त करत आहेत.




