पुण्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक; ११४ सिलिंडरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे : घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११४ गॅस सिलिंडर, पाइप, रेग्युलेटर, २ तीन चाकी टेम्पो, १ चार चाकी टेम्पो असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रफिक सुलतान शेख (वय ३८), सद्दाम अजिज शेख (वय २९), जमिर सुलतान शेख (वय ३६, तिघे रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक), देवीसिंग रामसिंग राजपुत (वय ३६, रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस शिपाई संदीप कोळगे यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रूक भागातील तुकाईनगर येथील मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅस पाइपद्वारे काढून रिकाम्या टाकीत भरण्यात येत होता. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी चारजण जीवनावश्यक वस्तु कायद्याचा भंग करुन घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग पाईपद्वारे व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना आढळून आले. तसेच एका रुममध्ये ११४ गॅस सिंलेडर, रेग्यूलेटर, सिलेंडर रिफीलींगसाठी लागणारे सात पाईप्स आढळून आले. त्यानूसार पोलिसांनी येथून सिलेंडर, टेम्पोंसह एकूण १७ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली. एका खोलीत हा अवैध व्यवसाय सुरू केला होता. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता ज्वलनशील पदार्थाचा वापर करून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हनुमंत कांबळे, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.




