हडपसरचे अट्टल २ गुन्हेगार एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपुरात स्थानबध्द
पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

पुणे : चाकू, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापती करणे, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे करणारे आणि लोकांमध्ये प्रचंड दहशत माजवणारे दोन गुन्हेगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या दक्षतेमुळे नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले गेले.
अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले (वय-१९ वर्षे, रा. शेख जीवनबापू चाळ जवळ, स्मशानभूमी रोड, शेवाळवाडी) अजय युसुफ मौजण ( वय १९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर) अशी गुन्हेगारांची नावे
असून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात येथे १ वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले. त्यांच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करत नव्हते.
भोसले याने साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकू, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, खंडणी, दुखापत, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.
मौजण हाही सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह रांजणगाव एमआयडीसी व हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घातक हत्यारांनी दुखापतीसह जबरी चोरी, जबरी चोरी, घराविषयी आगळीक, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. ५ वर्षांमध्ये त्याच्यावर ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा शहर यांच्या आधिपत्याखाली पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ही कामगिरी पार पाडण्यात आली.
रितेश कुमार यांनी या वर्षामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ७७ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस सुत्रांनी नमूद केले.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी साराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामूळे हडपसर भागातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे रविंद्र शेळके यांनी नमूद केले



