पुणे शहर

पोलीस आयुक्त वसुलीबहाद्दरांना दाखवणार मुख्यालयाचा रस्ता.? हप्ते वसुली करणाऱ्यांचे धाबे दणाणले

पुणे : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, मटका, गावठी दारू, वेश्या व्यवसाय आदी अवैध धंदे करणारे, अपरात्री पर्यंत सुरू राहणाऱ्या पब व बार चालकांकडून दरमहा हप्ते वसुली करणाऱ्या, ‘कलेक्टर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार करुन त्यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे मुख्यालयाचा रस्ता दाखवणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळत आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

के. वेंकटेशम पुण्यात पोलीस आयुक्त असताना त्यांनी अशा ‘कलेक्टर ‘ मंडळींच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांची यादी गोपनीय यंत्रणेमार्फत तयार केली होती. त्यानंतर दीर्घकाळाने अशा प्रकारची, भ्रष्ट पोलिसांना घाम फोडणारी कारवाई अमितेशकुमार यांनी सुरू केली असून पोलीस आयुक्तालयाच्या वर्तुळात याची दबकी चर्चा सुरू आहे.

पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात किंवा नियंत्रण कक्षात बदली करण्याचे संकेत अमितेशकुमार यांनी दिले असून ‘कलेक्टर’ मंडळींची आपली बदली टाळण्यासाठी किंवा कारवाई रोखण्यासाठी धावपळ सुरू आहे.

राजरोसपणे हप्ते वसूल करणारे संबंधित पोलीस कर्मचारी त्या त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना खूष ठेवत असतात. साध्या वेषात असणारे हे पोलीस कर्मचारी कायदा सुव्यवस्थेचे काम करण्याऐवजी भरपूर कमाई कशी होईल हे पाहत संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असतात. त्यांच्या कामाची वेळही निश्चित नसते. कधीही पोलीस ठाण्यात येऊन कधीही बाहेर पडणाऱ्या अशा ‘कलेक्टर ‘ मंडळींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लोभ असतो हे अनेक दशकांपासूनचे चित्र आहे.

अशा भ्रष्ट पोलिसांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत असते. त्यांना धडा शिकवला जावा अशी त्यांची आणि गैरधंदे करणाऱ्यांचीही इच्छा असते, मात्र असे ‘कलेक्टर ‘ कारवाई अभावी सोकावतात. त्यामुळे अपघातानेच कल्याणीनगर पब आणि पोर्शे कार हीट अँड रन सारखी प्रकरणे पुढे येतात.

संबंधित ‘कलेक्टर’ मंडळींवर दीर्घकाळाने कडक कारवाई होत असल्याने शहर पोलीस दलाचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page