जप्त केलेली वाहने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक ; ट्रॅफिक वॉर्डन अटकेत
'महाराष्ट्र मिशन' ने घेतला कारवाईसाठी पुढाकार

पुणे : वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली किंवा बिनधनी वाहने स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला चतुःश्रृंगी पोलिसांनी गजाआड केले. वॉर्डन आणि साथीदाराने ९ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्र मिशन’ ने या संदर्भातील तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केल्यानंतर सुत्रे वेगाने हालली.
अनिल तुकाराम लोखंडे (वय ३७, रा. अप्पर इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार ऋषीकेश महेश जाधव (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये अन्य काही आरोपी असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे.
वाहतूक विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येतो. जप्त केलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्या कमी किंमतीत मिळवून देतो, अशी बतावणी लोखंडेने त्यांच्याकडे केली.
सलमान चाँदबाशा शेख (वय २८, रा. काळुबाईनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांनी सर्वप्रथम ‘महाराष्ट्र मिशन’ चे मुख्य संपादक नरसिंग कांबळे यांची भेट घेतली आणि आपल्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
लोखंडे आणि साथीदाराने एक लाखात मोटार देतो, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी शेख यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. मोटारीबाबत शेख यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेख यांना आरोपींनी वाहतूक शाखेच्या व आरटीओच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट पत्र पाठविले. चौकशीत आरोपींनी दिलेले पत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.
हा प्रकार नरसिंग कांबळे यांनी केलेल्या चौकशीत लक्षात आला. नंतर शेख यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली. याप्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर लोखंडे याला अटक करण्यात आली. लोखंडे सहा महिन्यांपूर्वी चतुः श्रृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करत होता.
मध्यंतरी तक्रारदार शेख हे येरवडा कारागृहात ओळखीच्या एका कैद्याची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी लोखंडे याच्याशी त्यांची ओळख झाली. आपण पोलीस असून चतुःश्रृंगी वाहतूक पोलीस विभागात नियुक्तीस असल्याची बतावणी लोखंडेने शेख यांच्याकडे केली. त्यांचा विश्वास संपादन करुन पैसे उकळले.
लोखंडे आणि त्याचा साथीदाराने शेख यांच्याकडून वेळोवेळी नऊ लाख ६७ हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात घेतले. शेख यांनी तक्रार दिल्यानंतर चतु:र्श्रुंगी पोलिसांनी त्याला अटक केली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.



