मंत्री अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची महिलांकडून होळी

सिल्लोड, दि.६ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहेत.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील हा व्हायरल व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. यात काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसत आहेत. या साड्यांचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. मात्र मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली.
दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील पालोद, अन्वी, सारोळा, आसडी, रहिमाबाद या गावांमध्ये नवरात्र , दसरा, दिवाळीनिमित्त बहिणींची कृतज्ञता म्हणून लाडक्या बहिणींना साड्या भेट दिल्या होत्या. मात्र या साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण झाल्यानंतर काही शाब्दिक चकमक झाली होती. सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांना अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी साड्यांची होळी केल्याची माहिती समोर येत आहे.



