पुणे शहर

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे 'मेट्रो भवन'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात सुमारे ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मेट्रो भवन, पुणे – ठळक वैशिष्ट्ये;

⬛ एकूण क्षेत्रफळ सुमारे८१५ चौ. मीटर.

⬛भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिकवारशाचे दर्शन घडविणारी कला स्थापना.

⬛अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.

⬛३१२आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.

⬛काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page