२८८ आमदार असणा-या विधानसभेत यंदा २१ महिला आमदार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी (दि. २३) पार पडली. भाजप-१३२, शिंदेंची शिवसेना-५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांसह महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. एकूण २८८ आमदार संख्या असणा-या विधानसभेत यंदा २१ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातून एकूण ३६३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. सत्ताधारी महायुतीकडून ३० महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. (भाजप-१८, शिंदे शिवसेना-८, अजित पवार-४) यामध्ये १२ विद्यमान आमदार होत्या. महाविकास आघाडीकडून देखील ३० महिला उमेदवारांना निवडणूक तिकिट देण्यात आले होते. (शरद पवार-११, काँग्रेस-९, ठाकरेंची शिवसेना-१०) त्यांच्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. तर अपक्ष महिला उमेदवार देखील या निवडणुकीत मैदानात होत्या.
‘भाजप’च्या सर्वाधिक महिला आमदार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी निवडणुकीच्या मैदानात असलेल्या एकूण ३६३ महिला उमेदवारांपैकी २१ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. सत्ताधारी महायुतीच्या २० तर विरोधी पक्षातील केवळ १ महिला आमदार विधानसभेला निवडून आली आहे. यापैकी सर्वाधिक भाजपच्या जवळपास १४ महिला निवडून आल्या असून, त्यापैकी १० महिला उमेदवार या विद्यमान आमदार आहेत.



