पुणे शहरमहाराष्ट्र

पुण्यातील येरवडा कारागृहातून आता ‘कोर्ट’चे काम; न्यायालयीन कामकाजाला येणार गती

न्यायालयाचा वेळ व बेकायदेशीर गोष्टी टाळत प्रक्रियेला गती देण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कंपनीला कारागृहातूनच कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील येरवडा हे राज्यातील सर्वात मोठे कारागृह मानले जाते. कारण येथे कैद्यांची जास्त गर्दी असते. त्यामुळे पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो. बंद्यांची विविध कामात ने- आण करण्यात मोठा वेळ जात होता. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तोडगा काढला असून, कोर्ट कंपनी कारागृहातच कार्यान्वित करण्यात आल्याने ती प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे खटल्यांची तारीख पे तारीख टळणार आहे.

कारागृहातून बंदीना न्यायालयात, वैद्यकीय कामासाठी तसेच घरगुती अडचणीसाठी पोलीस उपलब्ध नसल्याची कारणे वारंवार दिली जात होती. न्यायालयानेही यावर वारंवार भाष्य करून कारागृह प्रशासनाला पत्रव्यवहार केल्याचे पाहायला मिळाले होते. याच अडचणीवर मात करण्यासाठी आता कोर्ट कंपनी कारागृहातूनच कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ व बेकायदेशीर गोष्टी टाळण्यास मदत होणार आहे. याच प्रक्रियेला गती देण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कंपनीला कारागृहातूनच कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच ठिकाणी त्यांना कैद्याची ने-आण करण्यासाठी छोटेसे शस्त्रगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तसेच, या ठिकाणी 100 जणांची टीम उपलब्ध असणार असून, त्यांना आलटून पालटून कैदी ने- आण करण्यासाठी ड्युटी लावण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दिवशी कोणता कर्मचारी कोणत्या न्यायालयीन बंदीला कारागृहात घेऊन जाणार याबाबतदेखील अचानक तिथल्या तिथे ड्युटी ऑफिसर तसेच पोलिस निरीक्षकाद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याने गैरप्रकार टाळण्यास यामुळे मदत होणार आहे.

एखाद्या गंभीर कैद्याला व बंद्याला तत्काळ रुग्णालयात हजर करायचे झाल्यास त्यासाठीही तत्काळ निर्णय घेण्यास मदत होणार आहे. बंदीवानांना न्यायालयात हजर केले जात नसल्याच्या तक्रारींनाही या नवीन व्यवस्थेमुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. कोर्ट कंपनी जरी कारागृहातून कार्यान्वित करण्यात आली असली तरी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाच्या आदेशानेच न्यायालयात हजर ठेवण्याचा व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

न्यायालयीन तारखांसाठी कैद्यी न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयाकडून कारागृह प्रशासनाला नोटीस तसेच ई-मेल करून सूचित केले जाते. त्यानुसार न्यायालयातील सुनावणींसाठी बंदीवान कारागृहाबाहेर काढले जात होते. या कोर्ट कंपनीला मुख्यालयातून ड्युटी लावली जात होती. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव हत्यारे घेण्यासाठीही वेळ खर्ची जात असल्याचा अनुभव वारंवार आल्याने थेट आता येरवडा कारागृहातूनही ही कोर्ट कंपनी आता काम पाहणार आहे. या नवीन प्रक्रियेमुळे कामात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page