मनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन !

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ मराठी कलाकारही एकवटले

मुंबई प्रतिनिधी : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्राजक्ता माळी हिने काल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. त्यानंतर प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्राजक्ताला सध्या सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे.

सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि त्यांचा निषेध करावा, या मागणीसाठी प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. प्राजक्ता माळी हिने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. प्राजक्ताने मांडलेल्या मुद्द्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याची देखील माहिती आहे. महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यासोबतच हवी ती मदत महायुतीकडून केली जाईल. तसेच कुणाच्याही इमेजला गालबोट लागू देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्राजक्ता माळी हिचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी प्राजक्ताने आपली व्यथा मांडली. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री काम करतात तेव्हा त्यांना कशाप्रकारे बोललं जातं, त्यांना बदनाम केलं जातं, याबाबत कुठला तरी ठोस कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी प्राजक्ता माळी हिने केली आहे.

महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं प्राजक्ताने कुटुंबासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तिच्या या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून प्राजक्ताला  पाठबळ देत आहेत.  विशाखा सुभेदार, हेमांगी कवी, गौतमी पाटील, कुशल बद्रिके, सचिन गोसावी यांच्यासह नितीन वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page