ठाणे महापालिकेने ३ हजार ८९१ अनधिकृत फलकांवर केली कारवाई, तर ७६ गुन्हे दाखल
अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे प्रतिनिधी : ठाणे महापालिकेने डिसेंबर महिन्यात ३ हजार ८९१ अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात बेकायदेशिररित्या फलक उभारले जात आहेत. या फलकांमुळे शहर विद्रूप होते. फलकांविषयी नागरिकांकडून तक्रारीही प्राप्त होतात. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती मार्फत डिसेंबर महिन्यात ३ हजार ८९१ अनधिकृत फलक हटवण्यात आले. तर एकूण ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.
अनधिकृत फलक आढळला तर त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक उभारण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक उभारता येणार आहेत. अशी माहिती पाटोळे यांनी दिली.



