नवी दिल्लीपुणे शहरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रीय

सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ खासदारांना ‘संसदरत्न’ जाहीर

मुंबई : देशातील १७ खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा ‘संसदरत्न’ पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारली असून महाराष्ट्रातील ७ खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणा-­या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने यंदाही बाजी मारली आहे. यात सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील खा. स्मिता वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना), नरेश म्हस्के (शिवसेना), अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा)आणि वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाऊंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१० मध्ये प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई-मॅग्झिन प्रेसेन्स यांनी संसदरत्न पुरस्कारांची स्थापना केली. मे २०१० मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे, श्री. हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते.

नागरी समाजाच्या वतीने हे पुरस्कार प्रदान केले जातात. २०२४ पर्यंत १४ पुरस्कार समारंभांमध्ये १२५ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक संसद सदस्य आणि संसदीय स्थायी समित्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page