पुण्यातून भाडेतत्त्वावर महागड्या मोटारी घेऊन पाकिस्तान सीमेजवळ विकणाऱ्यास अटक
चंदन नगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

पुणे : प्रवासासाठी मोटारी भाडेतत्त्वावर देणाऱ्या झुमकार कंपनीतील मोटारी चोरून राजस्थानात विक्री करणाऱ्या एकास मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. मोटारींची पाकिस्तान सीमेजवळील गावात विक्री तो करत होता.
त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे साथीदार पसार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सुफियान चौहान (वय १९, रा. फतेहगंज, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. प्रवासी मोटारी भाड्याने देणाऱ्या झुमकार ऍपवर नोंदणी केल्यानंतर मोटारी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतात. या कंपनीच्या ऍपवर चौहान आणि साथीदारांनी नोंदणी करून मोटारी भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. चौहान याने साथीदारांची ओळखपत्रे ऍपवर नोंदणीसाठी दिली होती. साथीदार महंमद सामा (रा. गुजरात) याचा शोध सुरू आहे.
चौहानने महागडी मोटार भाडेतत्त्वावर घेतली होती. मोटार घेऊन तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई पुणे येथून गाडया घेवून अवैध व्यवसायात वापर करण्यासाठी राजस्थान येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दाखल गुन्हयातील २० लाख रुपये किंमतीची प्राची रोहित पठारे ( रा. थिटे वस्ती, खराडी ) यांची एमजी हेक्टर कंपनीची गाडी ( नं. एम एच १२ टीके २८४७ ) शोध घेवून ती ताब्यात घेण्यात आली आहे. इतर दोन गाड्यांपैकी प्रकाश महापात्रा (रा. कोणार्क सोसायटी, वाघोली) यांची १५ लाख रुपये किंमतीची किया रोल्टारा गाडी व नंदलाल यादव ( श्रीवुड सोसायटी, धानोरी विश्रांतवाडी) यांची २५ लाख रुपये किंमतीची टाटा सफारी गाडी अशा दोन्ही गाड्यांचा शोध घेऊन त्या ताब्यात घेण्यात आल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विलास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आकाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम आदींनी कारवाईत भाग घेतला.



