मराठा आरक्षण आंदोलन सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पुणे : मराठा आरक्षण आंदोलन जर यांना सांभाळता येत नसेल, कायदा सुव्यवस्था राखता येत नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्राचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कमी पडत असेल तर हे सरकार हटवले पाहिजे. राज्यात आणि राज्याच्या राजधानीत महिला जर सुरक्षित नसतील तर गृहखाते काय करत आहे. या सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत आहे. गृहमंत्र्यांना जर हे झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे.
आझाद मैदान येथे सुरु असलेले मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होत आहेत. सीएसएमटी स्थानकात आंदोलकांनी गर्दी केली आहे तर आझाद मैदान परिसर तसेच रस्त्यांवर फक्त आंदोलक दिसत आहेत. मुंबईत गणपती उत्सव काळात आंदोलन होणार याची माहिती राज्य सरकारकडे होती. गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली होती. त्यानंतरही त्यांनी काही केले नाही. आज आंदोलन स्थळी जर काही घडत असेल तर त्यासाठी राज्य सरकार आणि गृहविभाग जबाबदार आहे. त्याचे इंटेलिजन्स काय करत आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सरकार अडचणीत आले तर शरद पवारांची आठवण
मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार का बोलत नाहीत, त्यांनी यावर काही तोडगा काढावा असे सत्ताधाऱ्यांकडून म्हटले जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता महायुती आणि त्यांच्या पक्षांकडे आहे. मात्र जेव्हा सरकार अडचणीत येते तेव्हा त्यांना शरद पवारांची आठवण होते. आमचा पक्ष छोटा, आमचे किती असे आमदार आणि खासदार आहेत, असे आम्हाला नेहमी म्हटले जाते. मात्र आता सरकार अडचणीत आले तर त्यांना शरद पवारांची आठवण होत आहे का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.



