राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; गमवावी लागली नोकरी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करणे एकाला भोवले आहे. डोंबिवलीतील कॅफेमध्ये काम करणा-या एका कामगाराला मनसेच्या दणक्यानंतर नोकरी गमवावी लागली आहे. आशुतोष गिरी असे कामावरून काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील (घरडा सर्कल) एका कॅफेमध्ये आशुतोष गिरी नावाचा कामगार काम करत होता. तो केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर कॅफेमध्येही मनसे पक्ष आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये करत असल्याची माहिती समोर आली. तसेच, तो त्या दुकानातील इतर मराठी कामगारांनाही त्रास देत होता, त्यांच्याशी वाद घालत होता. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे कॅफेमधील मराठी कामगार वैतागले होते.
या गंभीर बाबीची माहिती स्थानिक मनसे पदाधिका-यांपर्यंत पोहोचली. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने मनसे पदाधिका-यांनी थेट कॅफेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांनी व्यवस्थापकाला या प्रकाराबद्दल जाब विचारला. तसेच हा कामगार पुन्हा दुकानात दिसू नये, अन्यथा त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवू, असा स्पष्ट इशारा दिला.



