गुन्हेगारीपुणे शहरसामाजिक

नेमणूक ‘एलआयबी’ साठी, पूर्ण वेळ वसुलीचेच काम, पोलीस वसुलीदादाला हाताशी धरून औंध, बोपोडी,खडकीत अवैध धंद्यांना ऊत

पुणे : खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून वसुली दादा पोलिस कर्मचाऱ्यामुळे मटका, जुगार, हातभट्टी दारु, गांजा आणि गुटखा विक्री अशा अनेक गोष्टींचा खुलेआम व्यवहार सुरू आहे. खडकीतील साईबाबा मंदिराजवळ एक शाळा आहे. शाळेशेजारीच रात्री जुगार अड्डा भरतो. गुंड प्रवृत्तीच्या अनेक लोकांचा वावर येथे असतो.

हेमंत वाघमारे नामक पोलीस यामागे असल्याचे बोलले जात आहे. त्याची नेमणूक ‘एलआयबी’ म्हणजे स्थानिक गुप्तवार्ता विभागात आहे. मात्र तो पूर्ण वेळ अवैध धंद्यांमधून वसुलीचे काम करतो, अशी पोलिसांमध्येच चर्चा आहे. त्याच्या हप्ते बाजी मुळे मटका, जुगार चालवणारे, हातभट्टी दारु, गांजा आणि गुटखा विकणारे बिनधास्त असल्याचे सांगितले जाते. थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा त्याच्यावर वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

औंध, खडकी, खडकी बाजार, बोपोडी, मुळा, रोड, वाकडेवाडी बस स्टँड व पाटील इस्टेट या ठिकाणी जोरदार गुटखा विक्री सुरू आहे. खडकी बाजार येथे अमृततुल्य हॉटेल शेजारी आणि दर्गा वसाहत येथे व अमिनेशन फॅक्टरी रोड येथे मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे. खडकी बाजार येथे दर्गा वसाहत या ठिकाणी गावठी दारू विक्री सुरू आहे. खडकी रेल्वे स्टेशनच्या बाजूला शाळेच्या जवळ एका शटर मध्ये पत्त्याचा क्लब सुरू असून येथे अनेक गुंड प्रवृत्तीच्या इसमांची गर्दी होत असल्याचे म्हटले जात आहे.

बोपोडीत गोल्डन चौकात भामटी चाळीत जाधव नावाचे दोघे स्वतःच्या मालकीच्या घरात पत्त्याचा क्लब, जुगार अड्डा चालवत आहेत. बोपोडी मेट्रो स्टेशन जवळ स्वामी अण्णा सर्व प्रकारची दारू विक्री करत आहे. बोपोडी येथे रेल्वे फटकाच्या हाकेच्या अंतरावर गावठी दारू विक्री सुरू आहे.

पाटील इस्टेट येथे इराणी नावाचा इसम खुलेआम गांजा विक्री करत आहे. याच पाटील इस्टेट मध्ये १० व ४ नंबर गल्लीत गावठी दारू विक्री सुरू आहे. तसेच काही भंगार दुकानात रेल्वे व मेट्रो इतर अनेक ठिकाणचे चोरीचे लोखंडी साहित्य वसुलीदादाला हाताशी धरून खरेदी व विक्री केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी औंध चौकात मोबाइल फोन वरून ऑनलाईन पद्धतीने मटका जुगार घेतला जात असल्याचे चित्र आहे.  या मध्ये जग्गू नावाच्या इसमासह अनेक जण आघाडीवर आहेत. हा सर्व प्रकार स्थानिक पोलिसांना माहित असूनही कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या पाठिशी असलेल्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा देऊनही कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी आणि सामान्य नागरिकांना गुन्हेगारी पासून दिलासा देण्याऐवजी खाबुगिरी जोमाने सुरू असल्याने संवेदनशील नागरिक चिंतेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page