पुणे शहरलातूर

भव्य जाहिरातींमागे लपलेला ‘शिक्षणाचा बाजार’; ‘आरसीसी’ संचालक मोटेगावकरांच्या कुकर्माची पाळेमुळे शोधण्याची गरज!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन

पुणे/लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात अखेर अत्यंत मोठी कारवाई झाली आहे. “पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची हमी” देणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांच्या भव्य जाहिरातींच्या जोरावर पालकांना भुरळ पाडणारे लातूरच्या ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) अधिकृतपणे अटक केली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या सखोल चौकशीनंतर आणि ठोस पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, विशेष सीबीआय न्यायालयाने मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मोबाईलमध्ये सापडले पेपरफुटीचे काळे सत्य!

सीबीआयने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याच्या मोबाईल फोनमध्ये २३ एप्रिल रोजीच रसायनशास्त्र (Chemistry) विषयाशी संबंधित लीक झालेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आढळून आली होती. ही प्रश्नपत्रिका ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळणारी होती. टीव्ही चॅनेल्स आणि भिंतींवर “आपलं नाणं खणखणीत” असल्याचा आव आणणारे प्राध्यापक प्रत्यक्षात ‘खोटेगावकर’ निघाले असून, त्यांनी थेट पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग घेतल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

निवृत्त प्राध्यापकासोबत संशयास्पद भागीदारी

या प्रकरणातील अन्य आरोपी आणि लातूरमधीलच राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) समितीवर राहिलेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी मोटेगावकर सतत संपर्कात होता. कोचिंग सेंटरच्या माध्यमातून या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि पालकांच्या कष्टाच्या पैशांचा बाजार मांडण्यात आला होता. सीबीआयच्या २८ सदस्यांच्या पथकाने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे कार्यालय आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी छापे टाकून लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

पालकांचा संताप: प्रत्येक शहरात एक ‘मोटेगावकर’

मोटेगावकरांच्या या भामटेगिरीमुळे प्रामाणिकपणे, रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांवर मोठी अन्याय झाला आहे. “आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात एक मोटेगावकर तयार झाला आहे. जर सरकारने या खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण ठेवणारी समिती आधीच बसवली असती, तर आज कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जीव देण्याची वेळ आली नसती,” अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत.

मास्टरमाइंड कोण? सीबीआय चौकशीकडे लक्ष

मोटेगावकर याच्या डोक्यावर नेमका कोणाचा राजकीय किंवा संस्थात्मक ‘हात’ आहे, याचा शोध आता सीबीआय घेत आहे. पुढील ९ दिवस मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात असणार असून, या चौकशीतून शिक्षण क्षेत्रातील अनेक बड्या धेंडांचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page