पोलीस आयुक्तालयातील पोलिसांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर, शाळांजवळच्या दारु धंद्यांवर तक्रारीनंतरही कारवाई नसल्याने संताप

पुणे : विमाननगरच्या खांदवे नगर येथील कवडे वस्ती मध्ये ग्लोबल इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेला लागूनच अनेक महिन्यांपासून दिवसरात्र अवैधपणे दारूचा धंदा सुरू आहे. पत्र्याच्या शेडचे रूपांतर जणू परमिट रुम मध्ये झाले आहे. पोलिसांचे तेथे कोणतेही नियंत्रण नाही. गुटखा विक्री होत असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन करणारे पोलीस गुटख्यापेक्षा हजार पट घातक असलेल्या अवैध दारू धंद्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप आणि असाह्यता व्यक्त होत आहे. उत्पादन शुल्क विभागालाही हे दारू धंदे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विमाननगरच्या खांदवे नगर, सर्व्हे क्र. १२१, लेन क्र. ३ मध्ये कवडे वस्ती येथे ग्लोबल पब्लिक स्कूल ही शाळा आहे. शेजारीच जनावरांचा गोठा आहे, या गोठ्याच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये मोठा दारू धंदा सुरू असून या ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी दारूसह इंग्रजी दारू विक्री केली जात आहे. या ठिकाणी दारू बसून पिण्याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिकांसह परप्रांतीय कामगारांची मोठ्या संख्येने दिवसरात्र गर्दी जमा होत असते.
कवडे वस्ती मध्ये शाळेजवळ असलेल्या गोठ्याच्या शेडमध्ये सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत दारु पिणाऱ्यांची वर्दळ असते. परप्रांतीय कामगारांचा त्यात भरणा आहे. तेथे राडारोडा पडलेला असतो. दारूसह अमली पदार्थांचे सेवन करून काही दारुडे धिंगाणा घालतात तर काही नशेच्या धुंदीत उगाचच इकडून तिकडे मोकाट फिरत राहतात.

जवळच दाट लोकवस्तीही आहे. दुपारी अनेक लोक काम धंद्यासाठी बाहेर असतात. शाळा सुटल्यावर लहान मुली व मुले घरी असतात. अशा परिस्थितीत दारुड्यांकडून अतिप्रसंग होण्याची भिती आहे. येथे राहणे रामभरोसे असल्याचे नागरिकांच्या बोलण्यातून दिसून येते. मात्र पोलिसांनी याही ठिकाणी दुर्लक्ष केले आहे.
पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सातत्याने त्या परिसरातील महिला आणि शाळेतील शिक्षकांचे तर काही पत्रकारांचे तक्रार वजा फोन केले गेले. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सातत्याच्या तक्रारीनंतरही तेथे अवैध गोठ्याच्या शेडमधील दारू धंदा अबाधित असल्याचे दिसून येते. पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामागे दिसून येतो. शाळेशेजारील दारु धंद्याची माहिती देऊनही कारवाईस विलंब होत आहे.
शाळांच्या परिसरात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. तरीही विक्री जोमाने सुरू असल्याने याबाबत पोलिसांनी नुकतेच एक प्रकटन प्रसिद्ध करून नागरिकांना गुटखा विक्री होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र विमाननगरच्या खांदवे नगर येथील कवडे वस्ती मध्ये भर शाळेला लागूनच चालवल्या जाणाऱ्या अवैध दारू धंद्याकडे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पोलीस आयुक्तांनाही आहे माहिती?
स्वतः पोलीस आयुक्त आणि गुन्हे अपर पोलीस आयुक्तांना व्हाट्सअपवर ४/५ दिवसांपूर्वी खांदवे वस्तीतील दारु अड्डयाबाबत व्हिडिओ पाठवण्यात आले. तरीही कोणतीही कारवाई होत नाही. जोपर्यंत काही गंभीर गुन्हा होत नाही तोपर्यंत पोलीस डोळ्यांवर कातडे ओढून राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पूर्वी सारखा पोलीस आयुक्तांचा दरारा राहिलेला नाही, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



