म्हात्रे पुलाजवळील स्वच्छता गृह धूळ खात पडून
पुणे : म्हात्रे पुलाजवळ पुणे महानगरपालिकेने हजारो रुपये खर्चून बांधलेले स्वच्छतागृह धूळ खात पडून असून त्याचा वापरच कोणी करत नसल्याचे दिसून येते. स्वच्छतागृहामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी तसेच सर्वसाधारण नागरिकांसाठी तीन खास विभाग आहेत. तथापि या स्वच्छतागृहांमध्ये धूळ पाण्याचा अभाव आणि घाण आढळून येते.
कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयातर्फे काही महिन्यांपूर्वी मैलापाणी शुध्दीकरण केंद्राजवळ हे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या भागातून पादचाऱ्यांची तुरळक येजा असते. दत्तवाडी कडून कर्वे रोड कडे जाणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा वापर शक्यतो कोणी करत नसल्याचे दिसून येते.
स्वच्छतागृहाच्या वरील मजल्यावर स्वच्छतागृहाची देखरेख करणाऱ्या सेवकांसाठी विश्रांती कक्ष सुद्धा उभारण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या स्वच्छतागृहाचा वापर समाजकंटकांकडून होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या स्वच्छतागृहामध्ये धुळीचे साम्राज्य असून पाण्याची सुविधा सुद्धा नसल्याने ते क्वचित वापरणाऱ्यांसाठी सुद्धा निरुपयोगीच आहे. दुसरीकडे राजाराम पूल ते म्हात्रे पूल या डीपी रोडवरील दोन ते अडीच किलोमीटरच्या भागात एकही स्वच्छतागृह नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते. जेथे गरज आहे तेथे स्वच्छतागृहे न बांधता आडोशाला बांधून महापालिकेने लाखो रुपये पाण्यात घालवले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.



