महाराष्ट्रमुंबईराजकारण

खासदार श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘खूप अभिमान वाटतो बाबा!’

मुंबई : एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी एक खास भावनिक पोस्ट लिहिली आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येताच महायुतीला बहुमताचा कौल मिळाला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा समोर येत असून काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

याचदरम्यान एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी एक खास, भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!’ अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत ही पोस्ट लिहिली असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधीलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची नि:स्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वत:ला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी ‘वर्षा’ बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकीर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.

सत्तेचा मोह भल्याभल्यांना

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page