वरिष्ठ लिपिकाला एका ‘बार’मध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

यवतमाळ : जिल्ह्यातील प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक आणि एका वरिष्ठ लिपिकाला एका ‘बार’मध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. महसूल सहायक गोपाल महादेवराव मोहाडे (४४) व वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुयटे (३८) अशी आरोपी लोकसेवकांची नावे आहेत.
तक्रारदाराची कळंब तालुक्यातील मौजा मेंढला शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीचे स्वरूप ‘भोगवटादार वर्ग-२’ असून त्यांना ते ‘भोगवटादार वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करायची होती. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. ही प्रक्रिया तांत्रिक आणि कायदेशीर असल्याने महसूल विभागाची मंजुरी आवश्यक असते.
या कामाचा पाठपुरावा करताना, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक गोपाल महादेवराव मोहाडे याने या कामाच्या मोबदल्यात ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम स्वतः न स्वीकारता त्यांनी त्यांचे जुने सहकारी आणि सध्या पांढरकवडा तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुयटे यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचेची मागणी झाल्यामुळे तक्रारदाराने ६ मार्च रोजी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तातडीने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले आणि तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी, शहरातील गजबजलेल्या स्टेट बँक चौकातील ‘फ्रेंड्स बार’ मध्ये राहुल कुयटे हा मद्य रिचवत लाच स्वीकारण्यासाठी बसला होता. त्यावेळी सापळा रचण्यात आला.
राहुल कुयटे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या गोपाल मोहाडे यालाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



