हवाई केबल भूमिगत करण्याबाबतचे धोरण ठरविणे गरजेचे
क्रिएटिव्ह फाउंडेशनची पालिका आयुक्तांना सुचना

पुणे : केबलच्या अनधिकृत जाळ्यांवर कारवाई करण्यात आली. या केबल भूमिगत करण्याबाबतचे धोरण ठरविणे गरजेचे आहे,असे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
खर्डेकर म्हणाले की यापूर्वी मी अनेक वेळा हा विषय प्रशासनापुढे मांडला पण कधीच कारवाई झाली नाही. अनधिकृत वायरच्या जाळ्यामुळे शहराची स्कायलाईन तर बिघडतेच पण त्याचबरोबर याद्वारे इंटरनेट अथवा केबल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या शहरात याचा मोफत वापर करून गडगंज संपत्ती कमवत आहेत.
ते म्हणाले ”मी यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देऊन आकाशातील वाहिन्या भूमिगत करण्याची सक्ती करावी अशी मागणी केली आहे. मात्र याबाबत काही कंपन्याच्या प्रतिनिधिसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मांडलेली अडचण देखील महत्वाची आहे. यात रस्ते खोदाईचे शुल्क अव्वाच्या सव्वा असल्यामुळे आणि खोदाईची परवानगी घेताना होणारा त्रास व प्रत्यक्ष खोदाई करताना तेथे कोणत्या न कोणत्या खंडणीखोरांचा होणारा त्रास व वसुली यामुळे देखील अनेक कंपन्या रीतसर काम करण्यास धजावत नाहीत.”
मनपा आकारत असलेले शुल्क हे खोदाई झाल्यावर रस्ते पूर्ववत करण्यासाठी आकारले जाते मात्र रस्ते पूर्ववत केले जात नाही. तरी त्याबाबत ही धोरण ठरविणे गरजेचे आहे.
सध्या संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी खोदकाम करण्यात आले,तसेच महावितरणच्या कामासाठी देखील खोदकाम सुरू आहेच. त्याचवेळी येथे डक्ट तयार करण्यात आले असावे. आकाशातील वाहिन्यांना भूमिगत करताना त्याचा वापर करावा व त्याचे भुईभाडे आकारावे म्हणजे नव्याने खोदकाम करावे लागणार नाही, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.



