भूजल सर्वेक्षण विभागातील महिलेसह दोघा अधिकार्यांना लाच घेताना पकडले

पुणे: इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी २ लाखाची लाच घेताना भूजल सर्वेक्षण विभागातील महिलेसह दोघा अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर नामदेव धोटे (वय ५३, रा. संकेश्वर रॉयल सोसायटी, जाधववाडी, चिखली), कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका संदीपान घुले (वय ३९, रा. कुमार प्रिन्स विल्हे, जाधववाडी, मोशी) अशी दोघा लाचखोर अधिकार्यांची नावे आहेत.
ही कारवाई शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. पीएमआरडीएकडून त्यांना भुजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे तक्रारदारांनी भूजल सर्वेक्षण विभागाकडे अहवाल मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अहवाल देण्यासाठी घुले यांनी धोटे यांच्यासाठी अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. त्यावेळी घुले यांनी धोटे यांना तक्रारदारांना भेटून बोलण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे धोटे यांना भेटले. त्यांनी तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन लाचेची रक्कम घुले यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घुले यांना तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये स्वीकारताना सापळा रचून पकडले. त्यानंतर दिवाकर धोटे याला कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास हट्टेकर व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.



