सराईताचा खून करणाऱ्या ५ जणांना अटक
जुन्या भांडणाच्या कारणावरून मित्रांनीच त्याच्याच शस्त्राने काढला काटा

पुणे : वारंवार त्रास देणाऱ्या सराईत गुंडाचा त्याच्याच मित्रांनी, त्यानेच दिलेल्या शस्त्राने वार करून खून केला. फुरसुंगी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दुर्घटना फुरसुंगीमधील रुपीनगर येथील देशमुख पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात २८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली.
आकाश ऊर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी आदित्य नामेश्वर पिंपळे (वय २०, रा. प्रियदर्शनी रेसिडेन्सी, हडपसर), आदित्य कांबळे (वय २०), ओमकार प्रमोद मोरे (वय २३, रा. काळेबोराटेनगर, हडपसर), अरुण अनिल यादव (वय २४, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी), दत्ता व्यंकट गिते (वय २०, रा. शेवाळवाडी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कांबळे याची चुलत बहिण रेखा प्रभाकर कांबळे (वय ४२, रा. लिंबोणीनगर, प्रायव्हेट रोड, पुणे स्टेशन) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राणा कांबळे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही केले होते. राणा हा आरोपींना घेऊन फिरत होता. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना तो त्रास देत होता. राणा याने पालघनसारखी हत्यारे स्वतः बनवून घेतली होती. ती त्याने ओंकार मोरे याच्याकडे ठेवायला दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची व ओंकार मोरे याची भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी राणा यांच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर, कपाळावर व दोन्ही हातांवर पालघनने वार करून त्याचा खून केला.
खुनाची घटना समजताच गुन्हे शाखेची विविध पथके व खंडणी विरोधी पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलीस अंमलदार पवन भोसले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्हा करणारे आरोपी मस्तानी तलावाजवळ अंधारात बसलेले आहेत. या माहितीनुसार पोलीस पथकाने मस्तानी तलावाजवळ सापळा रचून तिघा आरोपींना पकडले. अरुण यादव याला पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तो शहरात येऊन राहत होता. फुरसुंगी पोलिसांनी अन्य दोन आरोपींनाही पकडले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, हवालदार नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलीस अंमलदार पवन भोसले यांनी केली.


