पुणे शहर

पुणे: गुन्हे शाखा युनिट-२ ची धडक कारवाई; जनता वसाहतीतून तब्बल १२ धारदार शस्त्रांसह एक जण व तीन अल्पवयीन ताब्यात

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्वती परिसरातील जनता वसाहतीत धाड टाकून बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह तीन विधीसंघर्षित बालकांना (अल्पवयीन) जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ८,५०० रुपये किमतीची १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व महेश मंडलिक हे पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की, जनता वसाहतीमधील गल्ली नं. ७७, राम मंदिराच्या पाठीमागे गौरव कांबळे हा त्याचे तीन साथीदारांसोबत बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे घेऊन थांबला आहे.

सदर माहिती गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार युनिटच्या पथकाने तात्काळ सापळा रचून गौरव राजु कांबळे (वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याला त्याच्या ३ विधीसंघर्षित साथीदारांसह ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आरोपी व बालकांविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म.पो.उप-निरीक्षक तेजश्री, उज्वल मोकाशी, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे व विनायक वगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page