गुन्हेगारीपुणे शहर

दिवे घाटात कायद्याचा ‘कोयता’! गुंडांच्या टोळक्याने माजवला थरार; पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात काल मध्यरात्री एका गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याने हातात नागव्या तलवारी आणि कोयते नाचवत प्रचंड दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे १०० ते १५० दुचाकींवरून आलेल्या या तरुणांनी घाटात आरडाओरडा करत आणि शस्त्रांचे प्रदर्शन करत कायद्याची भीती उरली नसल्याचेच जणू दाखवून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा हे टोळके दिवे घाटातून जात असताना त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. भररस्त्यात वाहने अडवून आणि शस्त्रांचा धाक दाखवत या तरुणांनी या परिसरात हैदोस घातला. या प्रकारामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुण्याच्या गुन्हेगारीत भर टाकणाऱ्या या ‘भाईगिरी’वर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

राजकीय वरदहस्त की गुन्हेगारीची हौस?

हे टोळके नेमके कोणत्या कारणासाठी एकत्र आले होते आणि त्यांना कोणाचे पाठबळ आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. हे तरुण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले, तरी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अशा प्रकारे १००-१५० गाड्यांचा ताफा शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी फिरतोच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर वेळीच या टोळक्याला वेसण घातली नाही, तर भविष्यात हे तरुण मोठ्या गुन्हेगारी कृत्यांना निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे पुणे आणि ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन, सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे या टोळक्याचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘मोक्का’ किंवा तत्सम कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मिशन’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page