खाकी डागाळली! पुण्यातील खंडणी प्रकरणात दोन पोलिसांना बेड्या; सेवेतून बडतर्फ झालेली ‘रील स्टार’ सोनाली हिंगे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी

पुणे (महाराष्ट्र मिशन, प्रतिनिधी) : पुणे पोलीस दलाला काळीमा फासणाऱ्या खळबळजनक खंडणी प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील आरोपी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) अजित बडे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी आणि ‘रील स्टार’ म्हणून मिरवणारी महिला पोलीस सोनाली हिंगे अजूनही पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेली दिसत आहे.
खंडणीखोरी उघडकीस येताच या तिघांचीही सेवेतून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली खरी, पण या कारवाईने पुणे पोलीस दलातील अंतर्गत सडलेली यंत्रणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती चव्हाट्यावर आली आहे.
सोशल मीडियावर रोज नवनवीन रील्स अपलोड करून ‘सिंघम’ स्टाईलने मिरवणारी सोनाली हिंगे आता स्वतः कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी लपत फिरत आहे. बडतर्फीची कारवाई होऊनही ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती सातत्याने आपले ठिकाण बदलत असून, पोलिसांची पथके तिच्या मागावर आहेत. एरवी कायद्याच्या गप्पा मारणारी ही ‘रील स्टार’ आता पोलिसांनाच गुंगारा देत असल्याने पुणे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
..आता यांचीही ‘रील’ बनवून धिंड काढा; पुणेकरांची संतप्त मागणी!
या संपूर्ण प्रकरणावर आता पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एरवी छोट्या-मोठ्या भुरट्या गुन्हेगारांना पकडून, त्यांची रस्त्यावरून धिंड काढत, त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’च्या बॅकग्राउंड म्युझिकसह अपलोड करून ‘पुणे पोलीस’ आपली पाठ थोपवून घेत असतात. कायदा किती कडक आहे, हे दाखवण्यासाठी पोलिसांचे सोशल मीडिया हँडल्स नेहमीच तत्पर असतात.
“मग आता कर्तव्यदक्षता बाजूला ठेवून थेट खंडणीखोरीत उतरलेल्या या खाकीतल्या गुन्हेगारांची धिंड पोलीस कधी काढणार?” असा सणसणीत सवाल जनतेतून विचारला जात आहे.
एरवी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पुणे पोलीस आता आपल्याच दलातील या बडतर्फ पोलिसांना ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चा खरा अर्थ समजावून सांगणार का? आणि ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारांचे व्हीडिओ बनवले जातात, त्याच धर्तीवर या खंडणीखोर पोलिसांची आणि फरार ‘रील स्टार’ सोनाली हिंगेची अटक करून त्यांचीही ‘रील’ बनवणार का? अशी जोरदार मागणी आता सोशल मीडिया आणि पुणेकरांमधून केली जात आहे.



