शिक्षणाचे माहेरघर’ की विकृतीचे केंद्र? पुण्यात पबचे नियम हवेत, गर्दीत अश्लील चाळे आणि महिलांच्या सुरक्षेचा धिंडवडा!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन
पुणे : कधीकाळी विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता पब संस्कृती आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम होऊ लागले आहे. मुंढवा आणि कोरेगाव पार्क परिसरात सलग दोन अशा धक्कादायक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला नामांकित ‘बॅस्टियन पब’मध्ये जाहीरपणे अश्लील चाळे सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला पबमधून परतणाऱ्या एका महिला वकिलावर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पब संस्कृतीचा अश्लील चेहरा; ‘बॅस्टियन’मधील व्हिडिओ व्हायरल
मुंढवा परिसरातील ‘बॅस्टियन पब’ मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्र संतापासह व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रात्री उशिरा सुरू असलेल्या पार्टीदरम्यान डान्स फ्लोअरवर, शेकडो लोकांच्या गर्दीत काही तरुण-तरुणी जाहीरपणे अश्लील वर्तन (चाळे) करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, आजूबाजूला मोठी गर्दी असतानाही पब प्रशासनाने किंवा तिथे उपस्थित इतरांनी त्यांना रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. पबना रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी असताना, येथे पहाटेपर्यंत पार्ट्या कशा सुरू राहतात? आणि या अशा अश्लील कृत्यांवर पोलिसांचे नियंत्रण का नाही? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
ओळख वाढवून महिला वकिलावर अत्याचार
या अश्लील व्हिडिओची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे एका महिला वकिलावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क आणि मुंढवा जोडणाऱ्या रस्त्यावर घडली. पीडित महिला रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका बड्या हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. तिच्यासोबत असलेले मित्र निघून गेल्यावर ती एकटी असल्याचे पाहून तिथल्या दोघांनी तिच्याशी ओळख वाढवली.
त्यानंतर ‘दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ’ असा आग्रह करत त्यांनी महिलेला कारमध्ये बसवले. कार मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरून जात असताना आरोपींनी तिच्याशी बळजबरी आणि अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केला. महिलेने प्रतिकार करत आरडाओरडा केल्यावर कार थांबवण्यात आली, तिथे आलेल्या त्यांच्या तिसऱ्या साथीदारानेही महिलेचा विनयभंग केला आणि तिची पर्स फेकून दिली.



