मार्केट यार्ड परिसरात मटका, दारू आणि गांजाची सर्रास विक्री; पोलिसांच्या ‘वसुली’ बहाद्दरामुळे गुन्हेगारी पोसली!

विशेष प्रतिनिधी / महाराष्ट्र मिशन
मार्केट यार्ड : मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या कायद्याचे नव्हे, तर अवैध धंदेवाल्यांचे राज्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथील एका दाट लोकवस्तीमध्ये ‘पिंटू’ नावाच्या इसमाने सुरू केलेला पत्त्याचा क्लब आणि एका इसमाने सुरू केलेला मटका जुगार अड्डा सध्या प्रचंड जोमात सुरू असून, यामुळे स्थानिक नागरिक मात्र पुरते ‘कोमात’ गेले आहेत. या अड्ड्यावर रोज पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी जुगार्यांची मोठी झुंबड उडत असून, यामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली आहे.
मटका, गुटखा आणि गांजाची सर्रास विक्री
गेल्या काही महिन्यांपासून मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात केवळ जुगारच नव्हे, तर इतरही अनेक गंभीर अवैध धंद्यांनी पाय पसरले आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राजरोसपणे मटका जुगार चालवला जात आहे. बंदी असलेला सुगंधित गुटखा आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या हातभट्टीच्या दारूची विक्री गल्लोगल्ली सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुण पिढीला उद्ध्वस्त करणारी गांजा विक्री सुद्धा काही ठिकाणी सर्रासपणे केली जात आहे. या वाढत्या अवैध धंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असून, चोऱ्या, वादावादी आणि हाणामाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याचेच पाठबळ आणि ‘वसुली’ची चर्चा
या सर्व प्रकारावर मार्केट यार्ड पोलिसांची कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचा एक ठराविक पोलीस कर्मचारी या सर्व अवैध धंद्यांना थेट पाठबळ देत आहे. या कर्मचाऱ्याकडून सर्व अवैध धंदेवाल्यांकडून नियमित मोठी ‘वसुली’ केली जात असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. खाकी वर्दीच्या याच आशीर्वादामुळे ‘पिंटू’सारखे अवैध धंदेवाले पोलिसांना न जुमानता आपले अड्डे चालवत असल्याचे बोलले जात आहे.
परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या जुगार अड्ड्यांवर आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार तात्काळ कारवाई करणार का? की वसुली बहाद्दर कर्मचाऱ्याला पाठीशी घालून या अवैध धंद्यांना असेच मोकळे रान दिले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



