पुणे शहर

पुणे हादरले! फुरसुंगीच्या स्टील व्यवसायिकाच्या कार्यालयावर भरदिवसा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी!

पुणे (प्रतिनिधी) :

पुण्यातील फुरसुंगी अंतर्गत येणाऱ्या मंतरवाडी परिसरात एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित स्टील व्यवसायिकाच्या कार्यालयावर अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कथितरीत्या ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’कडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंतरवाडी परिसरातील ‘एच विकास स्टील’ (H Vikas Steel) या कंपनीच्या कार्यालयाला लक्ष करून हा हल्ला करण्यात आला. ही कंपनी व्यावसायिक अमूल चामरिया आणि सनी चामरिया यांच्या मालकीची आहे. हल्लेखोरांनी कार्यालयाच्या आवारात तब्बल चार राऊंड फायर केले.

व्हिडिओ रेकॉर्ड करून गोळीबार

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन बुरखाधारी तरुण दिसत असून, त्यापैकी एक जण हातात पिस्तूल घेऊन उघडपणे गोळीबार करत आहे, तर त्याचा दुसरा साथीदार या संपूर्ण कृत्याचे मोबाईल फोनवर व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या धाडसी कृत्यामुळे पुणे पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सोशल मीडिया पोस्टने वाढवली खळबळ 

गोळीबाराच्या या घटनेनंतर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. या पोस्टमध्ये, “आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि टायसन बिश्नोई” यांनीच हा गोळीबार केल्याचा उल्लेख करत हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, “दिलेले इशारे आणि फोन कॉल्सकडे दुर्लक्ष केल्याचा” आरोप करत संबंधित व्यवसायिकांना थेट जीवे मारण्याची धमकीही या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुराव्यांची गोळाबेरीज सुरू केली असून, व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया पोस्टची आणि व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे. हे हल्लेखोर कोण होते आणि ते कुठून आले होते, याचा शोध घेण्यासाठी परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page