पुण्यात भरदिवसा गोळीबाराची सत्रे भोवली; दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या!

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडलेल्या सलग दोन गोळीबाराच्या गंभीर घटना पोलीस प्रशासनाला चांगल्याच भोवल्या आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली असून, दोन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय, गुन्हे शाखेच्या युनिटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्यातील खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात या गोळीबारातील दोन आरोपी वॉन्टेड असल्याचे समोर आल्यामुळे, स्वारगेट पोलिसांवरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
कोणाकुणावर झाली कारवाई?
प्राप्त माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित परिसराची हद्द असलेल्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचीही नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर काही अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेशही काढण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय घडली होती?
शुक्रवारी जुन्या वादातून घोरपडे पेठ पोलीस चौकीसमोरच भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या गेल्या, त्यापैकी एक गोळी त्याला लागली. ही घटना ताजी असतानाच, अवघ्या काही तासांत लोहियानगर परिसरात अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याची आणि एका मुलावर गोळीबार केल्याची दुसरी घटना समोर आली. मध्यवर्ती भागात सलग घडलेल्या या गोळीबाराच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने फेरबदल करत खडक पोलिसांच्या नेतृत्वात बदल केला. तसेच, गुन्हे शाखेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच चलबिचल पाहायला मिळत आहे.



