पुणे शहरलातूर

लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखान्याला मानाचा ‘बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६’ पुरस्कार जाहीर!

लातूर / पुणे : सहकार क्षेत्रातील साखर उद्योगात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लातूर येथील ‘विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याला’ द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘बेस्ट शुगर फॅक्टरी 2026’ विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने सलग तीन वर्षे शंभर टक्के ऊसतोड केवळ हार्वेस्टरद्वारे करून देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे वितरण आगामी ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे आयोजित ७१ व्या वार्षिक परिषद व शुगर एक्स्पो इंडिया २०२६ या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात येणार आहे.

सध्याच्या काळात मजुरांची कमतरता, वाढलेले ऊसक्षेत्र आणि विलंबाने होणारी ऊसतोड ही साखर उद्योगापुढील मोठी समस्या बनली होती. यावर कायमस्वरूपी उपाय शोधत कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीचा एक अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला. जिल्हा बँकेच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना सुलभतेने हार्वेस्टर उपलब्ध करून देण्यात आले.

त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी हार्वेस्टर खरेदीसाठी विशेष कर्जयोजना सुरू केली. या कल्याणकारी योजनेचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे हार्वेस्टर खरेदी केले आणि ते कारखान्यास भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले.

सध्या मांजरा साखर कारखान्याकडे स्वतःचे २५ हार्वेस्टर असून, कारखान्याच्या हमीवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले ५५ हार्वेस्टर अशा एकूण ८० हार्वेस्टर च्या माध्यमातून २०२५-२६ च्या गाळप हंगामात संपूर्ण शंभर टक्के ऊसतोड यंत्राद्वारे (हार्वेस्टर) करण्यात आली. या अभूतपूर्व कामगिरीमुळे १०० टक्के हार्वेस्टरद्वारे ऊसतोड करणारा देशातील पहिला साखर कारखाना म्हणून मांजरा सहकारी साखर कारखान्याची सुवर्णक्षरा Record नोंद झाली आहे. या यशाबद्दल लातूरसह राज्यभरातून कारखान्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page