गुन्हेगारीपुणे शहर

बुधवार पेठेत गुन्हे शाखेचा दणका; वेश्या व्यवसायातून दोन बांग्लादेशी तरुणींची सुटका, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न!

सपना बिल्डिंगमधील रॅकेट उघडकीस; दलालांत मोठा धसका

पुणे विशेष वृत्त : पुणे शहर पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (AHTU) बुधवार पेठेत एका कुंटणखान्यावर अचानक छापा टाकत वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या दोन बांग्लादेशी पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणी एका बांग्लादेशी महिला आरोपीसह दोघांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईमुळे स्थानिक फरासखाना पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.

गुप्त माहिती अन् छाप्याची थरारक कारवाई

दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला अत्यंत गोपनीय बातमी मिळाली होती की, बुधवार पेठेतील शनी मंदीराजवळ असलेल्या सपना बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर एका बांग्लादेशी महिलेकडून बळचोरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.

या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ बातमीची पडताळणी करून बनावट ग्राहक तयार करून पंचांसमक्ष खात्री केली. त्यानंतर नमुद ठिकाणावर अचानक छापा टाकून वेश्यागमनाकरिता आणलेल्या दोन बांग्लादेशी महिलांची यशस्वी सुटका करण्यात आली.

या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी १) शुली बेगम अफजल शेख उर्फ प्रिती रणजीत पात्रा (वय ३९ वर्षे, रा. सपना बिल्डिंग, चौथा मजला, शनी मंदीराजवळ, बुधवार पेठ, पुणे; मुळ पत्ता: गाव सुबोडा, थाना-अभयनगर, जि. जेसोर, देश-बांग्लादेश) २) रणजीत गदाधर पात्रा (वय ४२ वर्षे, रा. सदर) या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

गुन्हे दाखल व कायदेशीर कारवाई

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध १३ ऑगस्ट २०२६ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १४३ (३), ३ (५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ मधील कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांच्या सूचनांनुसार सहा. पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ व सहकाऱ्यांनी केली आहे.

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गुन्हे शाखेच्या पथकाने थेट धाड टाकून परदेशी तरुणींना वेश्या व्यवसायातून मुक्त केल्यानंतर, स्थानिक फरासखाना पोलीस नेमके काय करत होते? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या हद्दीत असा अवैधधंदा सुरू असताना त्यांना याची कुणकुण कशी लागली नाही, याविषयी चर्चेला उधाण आले आहे. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर मानवी तस्करी करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले असून त्यांनी मोठा धसका घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page