“कोणत्याही धर्माचा सण असो, डिजे नकोच”; पुणेकरांची रस्त्यांवर उतरून आक्रमक मागणी!

पुणे : ‘सण उत्सव आनंद देतात, शिक्षा नाही’, ‘माझे डोळे, माझे कान, माझं हृदय, माझा अधिकार’ अशा आशयाचे फलक आणि घोषणा देत पुणेकरांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात ‘डिजे’मुक्त उत्सवांची जोरदार मागणी केली आहे. तसेच बाजीराव रस्त्यावरही ज्येष्ठ नागरिकांनी ‘डिजे’विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदवला. कोणत्याही धर्माचा सण असो, डिजेचा कर्णकर्कश आवाज नकोच, यासाठी कठोर नियम करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका आंदोलक नागरिकांनी मांडली आहे.
सध्या ‘डिजे’मुक्त गणेशोत्सवावरून पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिकेतील बैठकीत ध्वनिवर्धकांचा वापर न करण्याची मागणी केल्यावरून निर्माण झालेला गदारोळ आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे हा विषय शहरात ऐरणीवर आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या यशोधरा गाडगीळ यांनी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाप्रमाणेच कर्कश आवाजाच्या ध्वनिक्षेपक भिंतींवरही कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. हे निर्बंध सर्वच धर्मांच्या सण-समारंभ, जयंती आणि लग्न कार्यांवर असावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रशासनाच्या अनास्थेमुळेच पुणेकरांना रस्त्यांवर उतराव्या लागल्याची टीका ‘आप’चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली.
शहरातील ध्वनिप्रदूषणामुळे लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाजीराव रस्त्यापासून शनिवार वाड्यापर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला. सण हे उत्साहाने साजरे व्हावेत, परंतु त्यासाठी पारंपरिक वाद्ये वापरावीत, अशी मागणी करण्यात आली. गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारी बैठकीत आवाज उठवणारे सजग नागरिक विद्यानंद बापट यांच्या भूमिकेनंतर हा लढा अधिक व्यापक बनला आहे. मूळचे रत्नागिरीचे असलेले आणि गेल्या आठ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठेत राहणारे ३७ वर्षीय बापट बीपीओ क्षेत्रात काम करतात. घरातून काम करत असताना त्यांना जाणवलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासातून त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला असून, सध्या त्यांची हीच भूमिका संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.



